
कुडाळ तालुक्यातील पिंगुळीत वाघांचा व नेरूर गावात बिबटय़ाचा भर मानवी वस्तीलगत मुक्त संचार सुरू आहे. पिंगुळी गोंधयाळे मुस्लिमवाडी येथील अस्लम खुल्ली यांच्या शेळा-मेंढीपालन प्रकल्पाजवळ गुरुवारी सकाळी एका वाघिणीसह दोन बछडय़ांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. ग्रामस्थांनी आरडाओरडा करताच वाघीण बछडय़ांसह जंगलाच्या दिशेने पळाली.
वाढत्या जंगलतोडीमुळे भक्ष्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीत दाखल होऊ लागले आहेत. मात्र या वन्य प्राण्यांच्या भीतीला मानवी वस्तीतील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी मुस्लिमवाडी व नेरूर कांडरीवाडी या भागात बिबटय़ा वाघांचा भर मानवी वस्तीत मुक्त संचार सुरू आहे. वारंवार बिबटय़ांचे नागरिकांना दर्शन होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे भीतीचे झाले आहे. गुरुवारी सकाळी पिंगुळी गोंधयाळे मुस्लिमवाडी येथील अस्लम खुल्ली यांच्या शेळी-मेंढीपालन प्रकल्पाच्या अगदी जवळच एक वाघीण दोन लहान बछडय़ांसह दिवसाढवळ्या फिरताना स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेत पडली. लागलीच ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. त्यानंतर ही वाघीण बछडय़ांसह नजीकच्या जंगलमय भागात पळाली. या वाघांच्या मुक्त संचारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुडाळ शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना याची माहिती मिळताच त्यांनी पिंगुळीत धाव घेत भयभीत झालेल्या ग्रामस्थांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, प्रसाद प्रभू, सुयोग ढवण, ग्रामस्थ अस्लम खुल्ली, मुनाफ खुल्ली व ग्रामस्थ उपस्थित होते. वन विभागाला याची माहिती देताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व शोधमोहीम सुरू केली.
वन विभागाकडून शोधमोहीम
कुडाळ वन विभागाला याची माहिती देताच अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत वाघिणीचा शोध सुरू केला तर नेरूर कांडरीवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ बुधवारी रात्री तेथील ग्रामस्थांना एका बिबटय़ा वाघाचे दर्शन झाले. भक्ष्याच्या शोधात बिबटे वाघ मानवी वस्तीत रात्री-अपरात्री दाखल होत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































