
सामना ऑनलाईन । हेग
हिंदुस्थानचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविषयीच्या खटल्याची सुनावणी येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुढील वर्षी 2019 मध्ये 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्राच्या मुख्य न्यायपालिका विभागाने दिली. विशेष म्हणजे या खटल्याचे लाइव्ह प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रांचे ऑनलाइन टेलिव्हीजन चॅनल आणि मागणीनुसार यूएन वेब टीव्ही आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाइटवर इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत होणार आहे. हेरगिरी, घातपाती कृत्ये केल्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा एप्रिल 2017 मध्ये पाकच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेली आहे. या शिक्षेला हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलेले आहे. या खटल्यासंदर्भात हिंदुस्थान-पाकिस्तानने आपापले म्हणणे सविस्तरपणे यापूर्वीच सादर केलेले आहे. जाधव यांनी इराणमधून पाकिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर आमच्या सुरक्षा दलांनी त्यांना अटक केल्याचे पाकने म्हटले आहे तर नौदलातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या व्यवसायानिमित्त जाधव हे इराणला गेले होते. तेथून जाधव यांचे पाकने अपहरण केलेले आहे.




























































