
सध्या आपल्याविरुध्द बोलणारा प्रत्येक माणूस देशद्रोही आहे, असे समजून त्याची मुस्कटदाबी करण्याचे जे धोरण केंद्र शासनाने अवलंबिले आहे त्याचा निषेध म्हणून सर्व साहित्यिकांनी एकत्र आले पाहिजे, असे खासदार कुमार केतकर यांनी आज येथे सांगितले.
कै. डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शंकर साहित्य दरबार या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे होते. व्यासपीठावर साहित्यिका अनुराधा पाटील, लक्ष्मीकांत तांबोळी, आमदार लहू कानडे, आमदार अमर राजूरकर, माजी आमदार डी.पी.सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले आदी उपस्थित होते.
कुमार केतकर पुढे म्हणाले की, साहित्य आणि राजकारण यांचा अन्योन्य सबंध आहे. स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी नेतृत्व केले त्यातील बहुतेकजण साहित्यिक होते. एवढेच काय जी गीते राष्ट्रगीत म्हणून आपण म्हणतो ते वंदे मातरम आणि जनगणमन ही गीते बंकींमचंद्र चट्टोपाध्याय आणि रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेली आहे. परंतू राजकारणामध्ये आपल्या प्रतिभाशक्तीने नेतृत्व करुन जनतेला जागृत करण्याची शृंखला आता खंडीत झाली आहे की काय, अशी शंका येते. साहित्य आणि राजकारणाचा हा धागा आता पुन्हा एकदा जोडला गेला पाहिजे, असेही कुमार केतकर म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या धोरणावर कठोर टिका करताना कुमार केतकर म्हणाले की, नोटबंदी करताना मोदी म्हणाले होते की, काळा पैसा बाहेर येईल आणि बनावट नोटा चलनामध्ये येणार नाहीत, परंतू नोटबंदीनंतर प्रत्यक्षात चलनामध्ये असलेल्या नोटांपेक्षा कितीपटीने जास्त नोटा सरकार जमा झाल्या. केंद्र शासनाचे हे धोरण साफ फसले आणि त्यामुळे सामान्य माणूस विनाकारण भरडला गेला.
फक्त टर्रेबाज भाषणे करणे एवढाच नरेंद्र मोदींचा उद्योग आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्यांना महात्मा गांधी चालतात परंतू महात्मा गांधींनी ज्यांना वारस म्हणून जाहीर केले ते जवाहरलाल नेहरु मात्र यांना चालत नाहीत. जवाहरलाल नेहरुंचा पराकोटीचा द्वेष हे नरेंद्र मोदींचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने पारीत केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या विधेयकास देशभरातून प्रचंड विरोध होत आहे. या विधेयकास विरोध होत असला तरी गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत की, हा कायदा रद्द होवू शकणार नाही, यास विरोध करणारे देशद्रोही आहेत. खरे म्हणजे पाशवी बहुमतावर पारीत केलेले हे विधेयक जनतेच्या हिताविरुद्ध आहे आणि तो कायदा रद्द होणारच नाही, असे म्हणणे चूक आहे. कारण बंगालच्या फाळणीचा निर्णय कायद्यात रुपांतरीत झाला होता तरीही जनतेच्या रेट्यामुळे तो कायदा रद्द करण्यात आला हे लक्षात घेतले पाहिजे. याबाबत न्यायालयानेही निःपक्षपाती दृष्टीकोण ठेवला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, आपल्या सर्वोच्च न्यायालयानेही मोदींच्या धोरणाशी सहमती दाखवली आहे, ही खेदाची बाब आहे.
नरेंद्र मोदींबद्दल मल्लिनाथी करताना कुमार केतकर म्हणाले की, 56 इंची छाती असलेल्या या नेत्याच्या भाषणात मुद्दे काहीच नसतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र शासन सध्या विरोधी आवाज दडपण्याचा जो प्रयत्न करीत आहे त्यावरुन असे वाटते की, या देशात आपले विचार मोकळेपणाने अभिव्यक्त करता येतील की नाही. बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी यांनी जे हम करे सो कायदा हे धोरण स्वीकारले आहे आणि पाशवी बहुमताच्या जोरावर लोकविरोधी कायदे करण्याचा सपाटा लावला आहे. याला विरोध झाला पाहिजे. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर सर्वांनी यास कडाडून विरोध केला पाहिजे, असेही अशोकराव म्हणाले. यावेळी आमदार लहू कानडे यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमात सुप्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डी.पी.सावंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले तर आभार उदय निंबाळकर यांनी मानले.

























































