जान कुमार सानुच्या वक्तव्याबद्दल वडील कुमार सानु यांनी मागितली माफी

जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा सज्जड दम दिल्यानंतर ताबडतोब कलर्स वाहिनीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली व यापुढे असे होणार नाही असे वचन दिले. आता जान कुमार सानु याचे वडील आणि गायक कुमार सानु यांनीही या प्रकरणी माफी मागितली आहे.

काल रात्री बिग बॉस चा होस्ट सलमान खान याने सुद्धा या संदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जान कुमार सानुला योग्य ती समज दिली आणि त्या नंतर ताबडतोब जान सानूने याबाबत चॅनल वर येऊन जाहीर माफी मागितली.

कुमार सानु म्हणाले की, गेली 27 वर्षे आपला मुलगा जान कुमार आणि त्याची आई आपल्यासोबत राहत नाही, पण आईने त्यावर काय संस्कार केले आपल्याला माहित नाही. आज माझ्याकडे जे काही आहे ते महाराष्ट्राच्या मातीने दिले. आज जान कुमारकडे जे काही आहे, ते ही याच मातीने दिले आहे. तरी त्याला असा नालायकपणा कसा काय सुचला अशा शब्दांत सानु यांनी आपल्या मुलाबद्दल राग व्यक्त केला आहे.

आपल्यालाही कोरोना झाला होता. तेव्हा बृहन्मुंबईने आपली काळजी घेतली, त्यांच्यामुळेच आपण बरे झालो असे सानु यांनी सांगितले. आपल्या मुलाने चुकीचे वक्तव्य केले त्याबद्दल आपण माफी मागतो असे सानु यांनी सांगितले.

कुमार सानू यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांची जाहीर माफी मागितली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र, बाळासाहेब यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधांना उजाळा देत आम्ही जे काही आहोत ते या महाराष्ट्र आणि मराठी माती मुळे आहोत अशी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या मुला कडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमाना बद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या