कृणाल पांडय़ा-दीपक हुड्डा यांच्यात वाद, शिवीगाळ व दमबाजीमुळे दीपकची स्पर्धेतून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर हिंदुस्थानातील क्रिकेट मोसमास प्रारंभ झाला. मात्र, त्यापूर्वीच सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याच्या संघात एक वाद समोर आला आहे. कर्णधार कृणाल पांडय़ा आणि उपकर्णधार दीपक हुड्डा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. कृणालने आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार करत अखेरच्या क्षणी दीपक हुड्डाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

रविवारी होणाऱया सामन्यापूर्वी बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात वाद झाला. झेलचा सराव करायचा की फलंदाजीचा यावरून दोघांमध्ये वाद झाला.

भांडणादरम्यान कृणालने आपल्या शिवीगाळ केली. दमबाजी करून कारकीर्द संपविण्याची धमकी दिली आहे, असे दीपकचे म्हणणे आहे. कृणाल पांडय़ाने आपल्याला शिवीगाळ केल्याची तक्रार दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशन (बीसीए) व ‘बीसीसीआय’कडे ईमेलद्वारे केली आहे. शिवाय टी-20 मुश्ताक अली चषक स्पर्धेतही आपण खेळणार नसल्याचे त्याने कळवले आहे.

करीअर संपविण्याची धमकी!

प्रशिक्षकांनी मला फलंदाजीचा सराव करण्यास पाठविले होते. मात्र, कृणाल पांडय़ा मला झेलचा सराव करण्यास सांगत होता. यावरून आमच्यात वाद झाला. तू बडोद्याच्या संघात खेळतोस कसा तेच बघतो. तुझे करीअर मी संपवून टाकेन अशी धमकी कृणालने मला दिली. मैदानावरून हॉटेलवर गेल्यानंतर माझे नाव संघातून काढून टाकण्यात आल्याचे समजले. त्यामुळे मी घरी निघून गेलो, असा दावा दीपक हुड्डा याने केला आहे.