
देवगड तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपासून मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शनरांग मंडपात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे भाविक उत्साहात दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्शनासाठी दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ,ग्रामस्थ, यांच्यासह महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या सहकार्याने मंगळवारी मध्यरात्री देवस्थान पुजारी गुरव, ग्रामोपाध्ये तसेच मानकरी देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर एम .के.घारे ज्वेलर्सचे उदय घारे, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,स्नेहल जाधव यांनी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून दर्शन घेतले. या वेळी नगरसेवक सुशांत नाईक देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू,नगरसेवक विशाल मांजरेकर,निवृत्ती तारी, गणेश गावकर गणेश वाळके अमोल लोके यांनीही दर्शन घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यावर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.
महसूल प्रशासन, पंचायत समिती यांचे मार्गदर्शन कक्ष, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय यात्रा उत्सव काळात कार्यरत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्ष कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्यात आला आहे. बुधवारी अमावास्या असल्याने या दिवशी पहाटे पासून भाविकांना देवस्वारी सोबत समुद्र स्नानाचा योग जुळून आला आहे. यात्रा उत्सवात आरोग्य विभाग, वीज विज वितरण कंपनी, बीएसएनएल ,आपत्ती निवारण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. विविध खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी, भांडी, खाजा, मिठाईसह इतर साहित्यांची दुकानांनी परिसर गजबजला आहे. या वर्षी देवस्वारीमध्ये प्रामुख्याने श्री जैन भरतेश्वर देवस्वारी मसुरे ,श्री देवी पावणाई देव रवळनाथ मालवण यांचा समावेश असून देवस्वारीसोबत स्नानाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.




























































