Naxal Attack- रामको नरोटाचे एन्काऊन्टर आणि गडचिरोली हल्ल्याचा संबंध काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kurkheda-blast1

सामना ऑनलाईन, गडचिरोली

शीघ्रकृती दलाच्या पथकावर हल्ला करून 15 जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल्यांचा स्थानिक म्होरक्या भास्कर याचं नाव अग्रक्रमावर आहे. भास्करसह एकूण 39 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यामध्ये खासगी वाहन चालकही मृत्यूमुखी पडल्याने या हल्ल्यातील मृतांची संख्या 16 झाली होती. बुधवारी जांभूरखेडा गावाजवळ झालेल्या या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. 39 नक्षलवाद्यांविरोधात हत्या, कट रचणे, देशविघातक कृत्ये करणे या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुराडा पोलीस या घटनेचा तपास करीत असून याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी रामको नरोटा या जहाल महिला नक्षलवाद्याचे एन्काऊन्टर करण्यात आले होते. रामको ही 15 पोलिसांचे जीव घेणाऱ्या गडचिरोली हल्ल्याचा गुन्हेगार भास्करची बायको होती. रामको नरोटाचे एन्काऊन्टर आणि गडचिरोली हल्ला याचा काही संबंध असावा असा अनेकांना संशय यायला लागला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलश बलकवडे यांनी 1 मे रोजी झालेला नक्षलवादी हल्ला कुठल्या एका घटनेची प्रतिक्रिया म्हणून बघता येणार नाही असं म्हटलं आहे.

दादापूर आणि कुरखेडा भागामध्ये जिथे वाहनांची जाळपोळ आणि हा नक्षलवादी हल्ला झाला होता तिथे पोलीस अत्यंत काळजीपूर्वक तपास करत आहेत. नक्षलवादी या दोन्ही ठिकाणांवर लक्ष ठेऊन असण्याची शक्यता आहे. तपासासाठी आलेल्या पोलिसांवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा तपास अत्यंत सावधतेने करावा लागत आहे. इंडीयन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.