कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टीत ‘टोटल लॉकडाऊन’, वाढत्या रुग्णसंख्येमुळे कठोर अंमलबजावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कुर्ला, चेंबूर आणि चुनाभट्टी भागात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये फक्त जीवनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सुविधा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पालिकेच्या एल वॉर्डमध्ये २५ एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ३७१ च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यासाठी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर विशेष प्रयत्न करीत आहेत. कुर्ला नेहरूनगर, चेंबूर, चुनाभट्टी भागात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसत आहे. त्यामुळे या विभागात नागरिकांना लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करावी असे आवाहन मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये मेडिकल, दूध अशा सेवा सुरू ठेवण्यात येत आहे. तर किराना धान्य दुकानदारांनी फोनवर ऑर्डर घेऊन डिलिव्हरी करणे, भाजी सोसायटीच्या आवारातच आणण्याची परवानगी देणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. याला नागरिक, दुकानदार आणि अत्यावश्यक सेवा पुरवठादारांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले. नागरिक, दुकानदार आणि अत्यावश्यक सेवा पुरवठादारांकडून असाच प्रतिसाद मिळाल्यास आपला विभाग लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वासही कुडाळकर यांनी व्यक्त केला आहे.