
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुर्ला नेहरू नगर एस.टी. डेपोतील कर्मचाऱ्यांवर डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांनी नाना प्रकारे चालवलेला जाच शिवसेनेने अखेर रोखला. शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून डेपो मॅनेजर आणि त्रस्त कामगारांची ‘आमने सामने’ बैठक घडवून आणली. त्यात समेट झाल्याने गुरुवारी होणारे ‘डेपो मॅनेजर चले जाव’ आंदोलन मागे घेण्यात आले आहे, असे कामगारांतर्फे विठ्ठल लोंढे यांनी जाहीर केले आहे.
एस.टी.च्या कुर्ला डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून भरमसाट दंड आकारणे, रजेवरून परतल्यानंतर रुजू करून न घेता दोन-दोन महिने त्यांना घरी बसवून त्यांचे आर्थिक नुकसान करणे असा जाच डेपो मॅनेजर बच्छाव यांनी चालवला होता. त्या कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाला दैनिक ‘सामना’ने गेल्या शनिवारी वाचा फोडली होती. त्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी मंगळवारी एस.टी. कर्मचाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा ‘शब्द’ दिला होता. त्या बैठकीत कुर्ला डेपोतील शेकडो कामगारांनी परिवहन मंत्री रावते यांना सादर करण्यासाठीचे सह्यांचे निवेदन कुडाळकर यांना सादर केले होते.
त्या पार्श्वभूमीवर आमदार कुडाळकर यांनी कुर्ला एस.टी. डेपोमध्ये जाऊन त्रस्त एस.टी. कामगार आणि डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांची संयुक्त बैठक घडवून आणली. त्यात डेपो मॅनेजरना भरमसाट दंडवसुली आणि अन्यायकारक कारवाईचे सत्र थांबण्याचे मान्य करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर एस.टी. कामगारांनी आमदार कुडाळकर यांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.



























































