नळपाणी रखडल्याने कुरुंदवाडमध्ये पालिकेवर गाजर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिकेच्या नूतन नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर बोंब ठोक अंदोलन करून बेमुदत कुरुंदवाड शहर बंद करण्याचा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिकेच्या नूतन नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदाराकडून मुदतीत न झाल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर शिवसेनेच्या वतीने गाव बंद आंदोलन करून पालिकेवर सोमवारी सकाळी गाजर मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाप्रमुख जाधव बोलत होते. यावेळी शहर प्रमुख राजू आवळे, तालुकाप्रमुख सतीश मलमे,महिला आघाडी प्रमुख मंगल चव्हाण,उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, आण्णासाहेब भिल्लोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

महाराणा प्रताप चौकातून जिल्हाप्रमुख जाधव शहरप्रमुख आवळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. कुरुंदवाड पालिकेने शहरवासीयांना गाजर दाखविले असल्याच्या निषेधार्थ हातात गाजर घेऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील सन्मित्र चौक, नवबाग रोड,जुने बसस्थानक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपालिका चौकात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील म्हणाले, कुरुंदवाड शहराच्या नूतन नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठ्याचा हा सामाजीक प्रश्न शिवसेना मार्गी लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले. शिवसेना आंदोलकांचे निवेदन स्वीकारून नगराध्यक्ष जयराम पाटील म्हणाले, पाणीपुरवठा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी नगर विकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानुसार गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याबाबत ठोस निर्णय घेणार आहे. शिवसेनेने एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगत आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.