26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार चौकशी, निकषात बसत नसतानाही लाभ घेतल्याचा संशय

अपात्र असतानाही ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण’ योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे उघड होऊ लागल्यानंतर आता सुमारे 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघर जाऊन चौकशी केली जात आहे. एकाच घरातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या निकषाची या 26 लाख लाडक्या बहिणींनी पायमल्ली केल्याची महिला व बालकल्याण विभागाची माहिती आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यापूर्वी चौकशीची भूमिका घेण्यात आली आहे.

सध्या 2 कोटी 29 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या. सरकारी नोकर असलेल्या महिला, इतर योजनांचा लाभ घेणाऱया महिला, घरी चारचाकी वाहन असलेल्या महिला, वयाची 65 वर्षे ओलांडलेल्या महिलांसह 14 हजारांवर पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. आता एकाच घरातील दोन महिला या योजनेचा लाभ घेत असल्याच्या माहितीवरून महिला व बालकल्याण विभागाने यादीच बनवून अशा महिलांना शोधण्यासाठी घरोघर जाऊन तपासणी सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत यादीतील महिला खरोखरच नियमाची पायमल्ली करत असतील तर त्यांना योजनेतून वगळले जाऊ शकते. म्हणजेच 26 लाख महिला या योजनेच्या लाभार्थींमधून कमी होऊ शकतात.