Macau Open Badminton 2025 – तरुण, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानच्या तरुण मन्नेपल्लीने गुरुवारी मकाऊ ओपन बीडब्ल्यूएफ सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित हाँगकाँगच्या ली चियुक यू याच्यावर खळबळजनक विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर लक्ष्य सेननेही अंतिम आठमध्ये स्थान मिळवले, मात्र महिला एकेरीत रक्षिता रामराजला पराभवाचा सामना करावा लागला. तरुण मन्नेपल्लीने उप उपांत्यपूर्व लढतीत 15 व्या मानांकित ली चियुक यू याला 19-21, 21-14, 22-20 अशा संघर्षपूर्ण सामन्यात हरविले. पहिला गेम गमावल्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रपुल सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या चिको ऑरा द्वी वार्दोयो याच्यावर 21-14, 14-21, 21-17 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्याला चीनच्या जू जुआन चेनच्या आव्हानाला सामेरे जावे लागेल.

आयुष शेट्टी, रक्षिता रामराज अपयशी

आयुष शेट्टीला मलेशियाच्या जस्टिन होहकडून 21-18, 21-16 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीत हिंदुस्थानचे एकमेव आशास्थान असलेल्या रक्षिता रामराजला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफन हिच्याकडून 14-21, 21-10, 21-10 असे पराभूत व्हावे लागले.

मिश्रित अन् पुरुष दुहेरीत पराभव

पाचव्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा व्रॅस्टो या जोडीला मलेशियाच्या जिम्मी वाँग आणि लेई पेई जिंग जोडीने 19-21, 21-13, 21-18 ने पराभूत केलं. पुरुष दुहेरीत पृथ्वी रॉय आणि साई प्रतीक जोडीला मलेशियाच्या चौथ्या मानांकित जुनैदी आरिफ आणि रॉय किंग या जोडीने 21-18, 21-18 अशा सरळ गेममध्ये हरवले.