
गतवर्षी नाकावरील शस्त्रक्रियेनंतर बराच काळ कोर्टपासून दूर राहिलेल्या लक्ष्य सेनची गाडी अखेर रुळावर परतली. बरेच दिवस अपयशी ठरत असलेल्या या हिंदुस्थानच्या जिगरबाज खेळाडूने कॅनडा ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लक्ष्य सेनने चुरशीच्या किताबी लढतीत चीनच्या ली शी फेंगचा प्रतिकार मोडून काढत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
67 वर्षांत एकेरीतील दुसरे विजेतेपद
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या 19व्या मानांकित लक्ष्य सेनने अंतिम लढतीत 10व्या मानांकित चीनच्या ली शी फेंगचा 21-18, 22-20 असा पराभव करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ही किताबी लढत 50 मिनिटांपर्यंत रंगली. 1957 सालापासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 67 वर्षांच्या इतिहासात हिंदुस्थानचे एकेरीतील हे केवळ दुसरे विजेतेपद होय. याआधी 2016मध्ये बी. साई प्रणीतने ही स्पर्धा जिंकली होती. याच वर्षी मनु अत्री व बी. सुमित रेड्डी या हिंदुस्थानी जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याचबरोबर ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थानी जोडीने 2015 मध्ये कॅनडा ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.
विजेतेपदाचा चौकार
21 वर्षीय लक्ष्य सेनने युवा गटात एकेरीमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य, तर 2 कांस्यपदके जिंकली होती. त्यानंतर आता वरिष्ठ गटातही त्याने विजेतेदाचा चौकार ठोकलाय. 2019मध्ये डच ओपन जिंकून त्याने वरिष्ठ गटात आपल्या विजेतेपदाचा श्रीगणेशा केला. याच वर्षी तो सारलॉरलक्स ओपनचाही चॅम्पियन ठरला. 2022 मध्ये लक्ष्य सेनचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्याने इंडिया ओपनचा किताब जिंकला, तर टीम चॅम्पियनशिपमध्ये थॉमस चषक व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. 2022मध्ये लक्ष्य सेन जर्मन ओपन व ऑल इंग्लंड ओपनचा उपविजेता ठरला. मग आता 2023 मध्ये कॅनडा ओपनचा किताब जिंकून त्याने जेतेपदाचा चौकार ठोकला.
ब्रेकमुळे लयीत यायला लागला वेळ
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लक्ष्य सेनच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो बराच काळ ब्रेकवर होता. त्यामुळे लक्ष्यला त्याच्या पुनरागमनानंतर लयीत यायला बराच वेळ लागला. मात्र, थायलंड ओपनची उपांत्य फेरी गाठून त्याने लयीत परतल्याचे संकेत दिले होते. अखेर त्याने कॅनडा ओपनचे विजेतेपद पटकावून आपण संपलेलो नाहीये हे दाखवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी लक्ष्य सेन फॉर्ममध्ये परतल्याने हिंदुस्थानला मोठा दिलासा मिळाला आहे.























































