
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली जाते. यंदा मंडळाने उत्सव रद्द करून आरोग्योत्सवाला गर्दी करीत भक्तांनी आगळावेगळा विक्रम केला आहे. मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 10 हजारांहून अधिक भक्तांनी रक्तदान केले असून 246 जणांनी प्लाझ्मादान करीत मोलाची भूमिका बजाकिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्सव रद्द करीत 4 ते 31 ऑगस्टच्या काळात आरोग्योत्सव साजरा करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार 22 ऑगस्टपासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 10 हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यावेळी चिनी सैनिकांशी लढताना गलवान खोऱ्यात हिंदुस्थानचे 20 वीर जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रुपये दोन लाख प्रदान करण्यात आले. तर कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील 111 पोलीस बांधव शहीद झाले. त्यापैकी आतापर्यंत एकूण 101 शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या वतीने शौर्यचिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
29 हजार जणांची आरोग्य तपासणी
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मंडळातर्फे यंदा जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जवळजवळ 29हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले आहे.

























































