लालबागमधील मराठी फेरीवाल्यांचा छळ बंद करा! शिवसेनेचा पालिका, पोलिसांना इशारा

लालबाग मार्केटमधील वडापाव, भाजी विक्री तसेच इतर लहानसहान वस्तूंची विक्री करून आपले पोट भरणाऱ्या सुमारे 100 फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलीस गेल्या 40 दिवसांपासून जास्त दिवस त्यांना व्यवसाय करू देत नाही, त्यांना जागेवर बसू दिले जात नाही. काबाडकष्ट करून व्यवसाय करणाऱ्या या प्रामाणिक फेरीवाल्यांविरोधात कोणतीही तक्रार नसताना मुंबई महापालिका आणि पोलीस हा छळ का करत आहेत. हा छळ थांबवा आणि फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय करू द्या. नाही तर महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढून याचा जाब विचारला जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, या अन्यायाविरोधात लालबाग फेरीवाला विव्रेता संघाच्या वतीने दोन दिवसांचे साखळी उपोषण करण्यात आले आहे.

मुंबईत गिरणी कामगारांचा संप झाल्यानंतर उदरनिर्वाह चालवण्यासाठी मोठया जिद्दीने कामगार, कामगाराची पत्नी, मुले यांनी मुंबईत नाक्या नाक्यावर वडापाव, भाजी विक्री आणि इतर किरकोळ वस्तूंच्या विक्रीचे व्यवसाय सुरू केले. प्रभाग क्रमांक 204 मध्ये येणाऱ्या लालबाग मार्पेटमध्येही असे सुमारे 100 फेरीवाले आहेत. हे फेरीवाले आरसीवाला चाळ ते के. टी. कुबलपर्यंत व्यवसाय लावतात. शिस्तीने, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे ते आपला व्यवसाय करतात, मात्र गेल्या 40 दिवसांपासून पालिका कर्मचारी आणि पोलीस त्यांना पदपथावर व्यवसाय करण्यापासून रोखत आहेत. हे सर्व स्थानिक रहिवासी असून गेल्या 50 वर्षांपासून परंपरागत व्यवसाय करीत आहेत. मात्र, व्यवसाय करण्यापासून रोखल्यामुळे फेरीवाल्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लालबाग फेरीवाला विव्रेता संघाने आज आणि उद्या असे दोन दिवसांचे साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. साखळी उपोषणाला शिवसेना गटनेते आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, विधानसभा संघटक सुधीर साळवी, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, शाखाप्रमुख किरण तावडे, लता रहाटे, समीक्षा परळकर, कांचन घाणेकर, सुजय गुरव, रूपाली चांदे, गौरी चौधरी यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.