
देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यासंबंधीत चाईबासा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आणखी एका गुन्ह्यातील अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन गुन्ह्यात जामीन मिळूनही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. परिणामी, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.
दुमका प्रकरणातील लालूंच्या शिक्षेचा निम्मा कालावधी 9 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. या प्रकरणातील जामिनाचा फैसला न्यायालयाने प्रलंबित ठेवला आहे. हा निर्णय होईपर्यंत लालूंना तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्यांच्यावर सध्या रिम्स रुग्णालयाच्या संचालकांच्या बंगल्यात उपचार केले जात आहेत.
विधानसभेच्या प्रचारात पहिल्यांदाच गैरहजरी
न्यायालयाच्या निर्णयामुळे घोर निराशा झालेल्या लालूंची बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारात पहिल्यांदाच गैरहजरी लागणार आहे. त्यामुळे राजदच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी लालूंचा धाकटा मुलगा तेजस्वीच्या खांद्यावर असणार आहे.
























































