
सामना ऑनलाईन, श्रीनगर
2016 मध्ये पाकव्याप्त कश्मीरात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये भीमपराक्रम गाजवणारे लान्सनायक संदीप सिंह सोमवारी कुपवाडा जिल्हय़ात अतिरेक्यांशी उडालेल्या चकमकीत शहीद झाले. निधडय़ा छातीने मृत्यूला सामोरे जाताना भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन अतिरेक्यांना यमसदनी धाडले.
कुपवाडा जिल्हय़ातील तंगधार सीमेवर लान्सनायक संदीप सिंह 4 पॅराकमांडो पथकासह गंगाधारी परिसरात सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू असताना त्यांना एका ठिकाणी संशयास्पद हालचाल दिसून आली. संदीप सिंह यांनी आपल्या पथकासह आगेकूच करताच समोरून गोळीबार करण्यात आला. कमांडो पथकानेही गोळीला गोळीने उत्तर दिले. शत्रू समोर उभा ठाकला. आमने-सामने लढाईला तोंड फुटले. गोळय़ांचा पाऊस पडला. संदीप सिंह यांच्या शरीराची चाळण झाली. समोर प्रत्यक्ष काळ दिसत असतानाही त्यांनी निधडय़ा छातीने शत्रूचा मुकाबला केला व तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. पण अतिरेक्याच्या एका गोळीने थेट मस्तकाचा वेध घेतला आणि संदीप सिंह यांना वीरगती प्राप्त झाली.
सर्जिकल स्ट्राइकमध्येही भीमपराक्रम
18 सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील लष्करी तळावर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. यात 21 जवान शहीद झाले. त्यानंतर हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरात सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या कमांडोंच्या पथकातील संदीप सिंह यांनीही पराक्रम गाजवला होता. 28 सप्टेंबर अमावास्येच्या काळय़ाकभिन्न रात्री 125 जवान तळहातावर शिर घेऊन पाकिस्तानात घुसले. 120 मिनिटांत 125 जवानांनी पराक्रमाची गाथाच लिहिली. अतिरेक्यांचा घेरून खात्मा करण्यात आला.


























































