दीडशे कोटींचे जमीन भेट प्रकरण, भुमरेंच्या चालकाची आयकर चौकशीला दांडी

सालारजंगच्या वारसाने तब्बल दीडशे कोटींची जमीन फुकटात भेट म्हणून दिल्याच्या प्रकरणात मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला आयकर विभागाने संपूर्ण व्यवहाराचा दस्तऐवज घेऊन चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, जावेदनेचौकशीला दांडी मारली आहे.

हैदराबाद येथील सालारजंगचे वारसदार मीर महेमुद अली यांनी कोणताही रक्तसंबंध, नातेसंबंध नसताना मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला जालना रोडवरील तब्बल दीडशे कोटींची जमीन ‘हिबानामा’ करून भेट म्हणून दिली. रातोरात अब्जाधीश बनलेला जावेद शेख यामुळे चर्चेत आला. या प्रकरणी परभणी येथील वकील अॅड. मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा गवगवा होताच आयकर विभागाने 3
जुलै रोजी जावेदला व्यवहाराची कागदपत्रे घेऊन 8 जुलै रोजी चौकशीसाठी नोटीस बजावली. मात्र, जावेद शेख चौकशीसाठी गेलाच नाही. चौकशीसाठी त्याने मुदत मागून घेतल्याचे आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिबानामाची चौकशी का रखडली?

हैदराबाद न्यायालयाने सालारजंगच्या वारसांमध्ये समेट घडवून आणत छत्रपती संभाजीनगरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीची वाटणीही करून दिली. यापैकी मीर महेमुद अलीच्या वाटय़ाला आलेली जमीन त्याने हिबानामा करून खासदार संदीपान भुमरेचा चालक जावेद शेख याला दिली. वास्तविक हिबानामा हा रक्तसंबंधात, नातेसंबंधातच करता येतो. मीर महेमुद अली आणि जावेद शेख यांच्यात असा कोणताही संबंध नाही. कारण सालारजंग हे शिया असून, जावेद शेख हा सुन्नी मुस्लिम असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा हिबानामाच बेकायदा असल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे.