करावेतील बेकायदा बांधकामे तोडण्याची फाईल पुढे सरकेना, भूमाफियांकडून सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा सपाटा सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करावे गावातील सेक्टर 36 मध्ये बांधण्यात आलेल्या जय मल्हार अपार्टमेंट या बेकायदा इमारतीवर कारवाईची फाईल महापालिका आणि सिडकोच्या अतिक्रमण विभागात पुढे सरकत नसल्याने तक्रारदारांमध्ये नाराजी पसरली आहे. ही इमारत उभी करणाऱ्या भूमाफियांनी एकच फ्लॅट अनेकांना विकून मोठी फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांचा हा फसवणुकीचा गोरखधंदा अजूनही सुरूच आहे. या इमारतीचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थितीत झाला होता.

तक्रारींची दखल नाही

जय मल्हार अपार्टमेंटवर तातडीने कारवाई करून नागरिकांची होत असलेली फसवणूक थांबवावी अशी मागणी तक्रारदारांनी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वारंवार केली आहे. मात्र त्यांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

हरिश्चंद्र तांडेल आणि मनोज तांडेल यांनी करावे गावात जय मल्हार अपार्टमेंट ही अनधिकृत इमारत बांधली आहे. या इमारतीत एकूण 32 सदनिका आणि दोन गाळे आहेत. या इमारतीमधील एक-एक घर तांडेल यांनी अनेक नागरिकांना विकून मोठी फसवणूक केली आहे. याप्रकरणी नेरुळ, एनआरआय आणि कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर या इमारतीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शासनाने नवी मुंबई महापालिका आणि सिडकोला दिले होते. मात्र त्यानंतरही या जय मल्हार अपार्टमेंटवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.