
सामना प्रतिनिधी, अलिबाग
आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महान खोऱ्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या डोंगराचा मोठा भाग कोसळून शेतकऱ्याच्या शेतात आला आहे. त्यामुळे सात ते आठ जणांच्या शेतात मातीचा ढिगारा आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याने याठिकाणी प्रशासनाचे कोणीही अधिकारी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा अद्यापही करण्यात आलेला नाही.
आठ दिवसापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने पूरस्थिती तसेच डोंगर, दरड कोसळले. अलिबाग तालुक्यात खानाव येथे वेलटवाडी येथे डोंगर कोसळल्याने येथील नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले आहे. त्याचवेळी अलिबाग रोहा रस्त्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या महान आदिवासी वाडीवर ही डोंगर कोसळला होता. त्यामुळे डोंगराच्या मातीचा ढिगारा हा खाली येऊन शेतकऱ्याच्या शेतात घुसला आहे. भाया लेंडी, भाग्या लेंडी, जानू काष्टी व इतर पाच जणांच्या शेतात ही माती व झाडे झुडपे वाहून आली आहेत.
डोंगराच्या मातीचा ढिगारा व झाडे झुडपे शेतात वाहून आल्याने लावलेली शेतीची पिके नष्ट झाली आहेत. पिकत्या शेतात ढोपरभर माती साचल्याने लागवडीची जमीन नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे करोडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर एवढी नैसर्गिक आपत्ती येऊनही महसूल विभागाचा एकही कर्मचारी, अधिकारी याठिकाणी पोहचलेला नाही. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती येथील आदिवासी शेतकरी करीत आहेत.
























































