धक्कादायक! रात्री चार्जिंगला लावलेला लॅपटॉप फुटला, चेहऱ्यावर २५ शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अनेकांना रात्री झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावण्याची सवय असते. मात्र असं करणं मुंबईतील एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे. झोपताना चार्जिंगला लावलेला लॅपटॉप फुटला आणि यामध्ये चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निशांत केडिया असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. गंभीर दुखापत असल्याने त्यांच्यावर पाच महिन्यात तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

लॅपटॉपच्या स्फोटात जखमी झालेल्या निशांत यांच्यावर पाच महिने मुंबईतील भाटिया रुग्णालयात उपचार सुरू होते. या संपूर्ण घटनेमुळे निशांत यांनी अत्यंत जवळून मृत्यूचा अनुभव घेतला आहे. या काळात त्यांना गंभीर दुखापतीमुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. पण यामध्ये ते डगमगले नाहीत. सोमवारी निशांत यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. निशांत यांची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी आणखी काही काळ लागणार असल्याने काळजी घेण्याचा सल्लाही त्यांना डॉक्टरांनी दिला आहे.

९ डिसेंबर २०१७ रोजी निशांत बेडरुममध्ये लॅपटॉपवर काम करत होते. काम करताना त्यांना झोप यायला लागली. मात्र त्याचदरम्यान त्यांनी बेडवर लॅपटॉप चार्जिंगला लावला होता आणि मध्यरात्री अचानक लॅपटॉपचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून लगेचच निशांत, यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या बेडरुमकडे धाव घेत दरवाजा उघडला. आगीमुळे बेडरूममध्ये हवेचा दाब तयार झाला होता म्हणून दरवाजा उघडता आला नाही. मात्र त्यांनंतर शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली.

लॅपटॉपच्या भीषण स्फोटामुळे निशांत यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेम मात्र गंभीर दुखापत असल्याने खासगी रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. स्फोटामुळे निशांत यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. कान, नाक भाजल्यामुळे त्यांची अवस्था गंभीर होती. उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या पाच महिन्यात जवळपास २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच प्रकृतीत योग्य सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्ज दिल्याचंही त्यांनी सांगितलं.