लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी छापेमारी करत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त केला आहे. एकूण 1 कोटी 19 लाख 72 हजार 341 रुपयांचा मुद्देमाल या छापेमारीत हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी मुरुड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल वसंत कापसे, विशाल गुट्टे, संदिपान बाबुराव विटेकर, बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया, भैरू नरसू गुट्टे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहेत.
मुरुड हद्दीत काही इसमांनी विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले. यावेळी पहिल्या कारवाईत 66 लाख 40 हजार 101 रुपयाचा आणि दुसऱ्या कारवाईत 53 लाख 32 हजार 240 असा एकूण 01 कोटी 19 लाख 72 हजार 341 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा हत्ती वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.