
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील कापशी खोऱयातील चिकोत्रा नदीच्या काठावर असणाऱया अर्जुनवाडा व नंद्याळ गावातील सुमारे 250 एकर (100 हेक्टर) ऊस पिकावर लष्करी अळीच्या रूपाने नैसर्गिक आपत्ती कोसळली. महिनाभरापूर्वी झालेल्या तुफान गारपिटीने संकटात सापडलेल्या येथील शेतकऱयांना लष्करी आळीने पुरते उद्ध्वस्त केले आहे.
कापशी खोऱयातल्या अर्जुनवाडा परिसरात 26 एप्रिल रोजी प्रचंड गारपिटीची नैसर्गिक आपत्ती आली होती. याच परिसरातील चार गावांतील भाजीपाला, फळे, मका आणि ऊस पिकांचे सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने नमूद झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाले असून, अद्यापि नुकसानभरपाई मिळालेली नाही. तोवरच दोन दिवसापासून याच शेतकऱयांवर लष्करी आळीचे दुसरे संकट घोंगावले आहे. अवघ्या दोन दिवसांत या अळीने अर्जुनवाडा येथील 100 हेक्टरवरील ऊस पिकाचा फडशा पाडला आहे. आंतरपिकासह बांधावरील हत्ती गवतही खाऊन टाकले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर येथील मका संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. एस. महाडिक, एन. बी. घोडके, कृषी विभागाचे अधिकारी आर. जी. पाठक, अनिकेत माने, सुनील बुगडे यांनी उसाचे निरीक्षण केले. उपाययोजना करून औषधे सुचवली आहेत.
मायाथिमना सेपरेटा अळीचा ‘प्रताप’
उसावर कधीही अशा प्रकारच्या लष्करी अळीने हल्ला केल्याची घटना कृषी विभागाकडे नोंद नाही. त्यामुळे या प्रकाराने कृषी विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. ‘मायाथिमना सेपरेटा’ नावाच्या लष्करी अळीचा हा प्रताप असावा, असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे. या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने सुमारे 200 शेतकऱयांच्या शेतात ‘इमाम मेक्टीन बेंझाईन’ सामूहिक फवारणी सुरू केली आहे. मात्र, आणखी 200 एकर ऊस पिकावर या लष्करी अळीने हल्ला चढवल्याने शेतकरी व कृषी विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.
लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक औषध फवारणी गरजेची आहे. त्यासाठी औषधांचा पुरवठा करत आहे. परिसरातील ग्रामपंचायती, दूधसंस्था यांच्याकडे औषधांचा डोस कसा फवारावा ते कळविले आहे. यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला आहे.- आर. जी. पाठक, विभागीय कृषी अधिकारी.

























































