चाळीतली माणुसकी टॉवरमध्येही टिकून राहो!शेवटच्या दिवाळीत दाटला आठवणींचा गहिवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिढय़ान्पिढय़ा इथे राहिलो. इथेच जन्मलो, मोठे झालो. आयुष्यात बरेवाईट प्रसंग अनुभवले. चार भिंतीच्या आत छोटय़ाशा घरात आनंदाने, समाधानाने राहिलो. एवढय़ाशा मनात अगणित आठवणी दाटल्या आहेत. कधी हलकेच हसवणाऱ्या…तर कधी नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या. त्या एकामागोमाग एक आज बीडीडी चाळवासीयांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. यंदाची त्यांची चाळीतली अखेरची दिवाळी. दारात कंदील लावताना ते अक्षरशः भावूक झाले. घरं मोठी होतील. उंच होतील. पण चाळीत जी माणुसकी आहे ती तिथेही टिकून राहो आणि ती टॉवरइतक्या उंचीची होवो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मुंबईमध्ये वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी आहेत. त्या चाळींच्या जागी आता टॉवर उभे राहणार आहेत. चाळी रिकामी करण्याआधीच त्यांच्या नव्या घराची लॉटरी काढली गेली आहे. पुढची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही बीडीडीवासीयांची चाळीतली शेवटची दिवाळी. दिवाळीनंतर त्यांना संक्रमण शिबिरांमध्ये जावे लागेल. नवे घर मिळणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे, पण जुन्या घरातून जाण्याचे दुःखही छोटे नाही. चार भिंतीमध्ये त्यांनी सुखाने संसार केला. नव्या घरात भिंती वाढतील, पण त्याबरोबरच चाळीतला शेजारधर्म, माणुसकी, जिव्हाळा तिथेही कायम रहावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे.

बीडीडी चाळीतील रहिवाशांचे मोठय़ा घराचे स्वप्न पूर्ण होईल यात वादच नाही. पण इथे जगण्याचा जो आनंद मिळाला तो मात्र पुन्हा मिळणार नाही. ना. म. जोशी मार्ग विभागाने 16 शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू दिले. त्यांचा पिंड इथल्या मैदानांवरच घडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाची परंपरा अनेक दशकांपासून आम्ही जपतोय. सध्या एका इमारतीत 80 घरे आहेत. प्रत्येक इमारत, तिथल्या मंडळांची वेगळी ओळख आहे.  दोन टॉवरमध्ये सर्व इमारतीतील रहिवाशांना घरे मिळाली तर या मंडळांचे अस्तित्व उरणार नाही.
– जीवन पैलकर, ना. म. जोशी मार्ग बीडीडी रहिवासी

आम्ही इथून गेलो तरी आठवणी कायम राहतील. माणुसकी, शेजारधर्म, एकोपा…काय काय सांगावे. आठवणींचा हिंदोळा आहे. माझे वय 68 वर्षे आहे. चाकूसुऱ्यावाल्यांची दादागिरी पाहिली तशीच उच्चशिक्षित होऊन मोठय़ा पदांवर विराजमान झालेली नवी पिढीही पाहतोय. आता आमची पाचवी पिढी आहे. फोडणीचा वासच नाही तर इथे घरात बनवलेले जेवणही शेजाऱयांबरोबर वाटून खाल्ले जाते. फ्लॅटमध्ये होईल तसे?… वाटत नाही. पूर्वी कुणाच्या घरात लग्न असले की गॅलरीत पंगती बसायच्या. एकाच्या घरी लग्न असेल तर संपूर्ण माळ्यावरची मंडळी त्यात मदतीला असायची. भांडणंही होती, पण तात्पुरती.
– नंदूमामा मातोंडकर, वरळी बीडीडी रहिवासी

 फ्लॅटच्या बंद दाराआड आपुलकीची देवाणघेवाण अशक्य

इथून जाताना निश्चितच वाईट वाटणार. रडूही येईल. कारण इथले खेळीमेळीचे वातावरण नव्या वास्तूमध्ये मिळेल की नाही सांगता येणार नाही. मिळेलही कदाचित. नव्या इमारती याच जागेवर उभारल्या जाणार आहेत, पण शेजारी बदलतील. चाळीत होणारी आपुलकीची देवाणघेवाण फ्लॅटच्या बंद दाराआड होणार नाही. इथल्या सण-उत्सवांची मजा तिथे नसेल.
– अजय राणे, वरळी बीडीडी रहिवासी

घरं मोठी होताहेत, पण माणसं कमी होत चालली

बीडीडी चाळीने आम्हाला घडवले. जागा कमी पडते, पण आज सकाळी उठल्यावर माळ्यावर 20 खोल्या दिसतात. नव्या इमारतीत फक्त आठच असतील. घरं मोठी होताहेत, पण माणसं कमी होत चालली आहेत.
– संतोष पवार, वरळी बीडीडी रहिवासी