लोकल ट्रेनचा प्रवास असुरक्षितच! गतवर्षी विविध कारणांमुळे रेल्वे मार्गावर 2287 लोकांनी प्राण गमावले

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूने रेल्वे मंत्रालय विविध विकासकामांची घोषणा करीत आहे. मात्र ते प्रकल्प लोकल प्रवास सुरक्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. गेल्या वर्षी उपनगरी रेल्वेच्या मार्गावर 2287 लोकांचा मृत्यू झाला. दररोज सहा जणांचा लोकल प्रवासात बळी गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे उपनगरी रेल्वेमार्गावरील मृत्यूदर कमी होईल, असा दावा रेल्वे प्रशासन वेळोवेळी करते. मात्र प्रत्यक्षात लोकल प्रवासातील मृत्युसत्र थांबलेले नाही. रेल्वे पोलिसांच्या नोंदीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुंबईत रेल्वेने प्रवास करताना विविध कारणांमुळे दररोज सहापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. वर्षभरात 2287 प्रवाशांनी विविध अपघातांत प्राण गमावला. 2024 च्या तुलनेत प्रवासी मृत्यूचे प्रमाण केवळ 7 टक्क्यांनी कमी झाले. 2024 मध्ये 2468 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2025 मध्ये 2557 प्रवासी जखमी झाले. 2024 मधील जखमी प्रवाशांच्या 2697 इतक्या संख्येच्या तुलनेत गेल्या वर्षी केवळ 5 टक्क्यांची घट झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून रेल्वे मार्गांवर विविध प्रकल्प राबवले जात आहेत. असे असतानाही लोकल प्रवाशांच्या मृत्यूचे सत्र रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना चिंता व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने ठोस कृती करण्याची वेळ आलीय, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांच्या पदाधिकारी देत आहेत.

रेल्वे रूळ ओलांडणे सर्वाधिक धोकादायक

गेल्या वर्षी नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास निम्मे म्हणजेच 1063 मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याचे स्पष्ट होत आहे. यातील सर्वाधिक मृत्यू ठाणे विभागात (144) नोंद झाले. गेल्या वर्षी ठाणे विभागात सर्वाधिक 278 मृत्यूची नोंद झाली. त्यापाठोपाठ कल्याण विभागात 266 मृत्यू, तर बोरिवली विभागात 244 प्रवाशांना प्राण गमवावा लागल्याचे जीआरपीच्या आकडेवारीवरून उघडकीस आले आहे.