साहित्यआभा – निराशेतून आशेचा शोध

>> डॉ. जयदेवी पवार

यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरीचे साहित्यिक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना देण्यात आला. 2002 मध्ये हंगेरीचेच लेखक इम्रे केर्तेश यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर जवळ जवळ 20 वर्षे हंगेरी शांत होती. क्रास्नाहोरकाईंच्या पुरस्कारामुळे ती शांतता पुन्हा एकदा बोलकी झाली आहे. भयाच्या काळातही कला टिकून राहते, यावर विश्वास ठेवणाऱया लास्झलो यांच्या दृष्टिवान लेखनासाठीचा हा सन्मान कलेची ताकद दर्शवणारा आहे.

साहित्यातील नोबेल पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रास्नाहोरकाई यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने व्यक्त केलेले मनोगत लास्झलो क्रास्नाहोरकाई यांच्याविषयी सर्व काही सांगून जाणारे आहे. प्रलयकाळातही कलेची ताकद दाखवून देणाऱया, प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यकृतींसाठी लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे. म्हणजेच भयाच्या काळातही कला टिकून राहते, यावर विश्वास ठेवणाऱया त्यांच्या दृष्टिवान लेखनासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

लास्झलो क्रास्नाहोरकाई यांचा जन्म 1954 मध्ये हंगेरीतील रुमानियाच्या सीमेनजीक असलेल्या द्युला शहरात झाला. झेगेद आणि बुडापेस्टमध्ये त्यांनी 1970 च्या दशकात कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर ते साहित्य निर्मितीकडे वळले. युरोप, आशिया आणि अमेरिका खंडांमध्ये त्यांनी विपुल प्रवास केला आहे. त्या काळात हा देश इतिहासाच्या दडपणाखाली थकलेला होता. या शांत, पण वेदनादायी वातावरणातूनच त्यांच्या लेखनाचा जन्म झाला. त्यांच्या कादंबऱयांमध्ये नामशेष झालेला विश्वास, माणसाची थकलेली चेतना आणि तरीही जगण्याच्या पोकळीत टिकून राहण्याची जिद्द अनुभवास येते. त्यांची वाक्यरचना लांब आणि काहीशी दुर्बोध असली तरी ती खोल विचारांनी भरलेली असते. त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱया ‘सातांतांगो’, ‘द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स’ आणि ‘वॉर अँड वॉर’ या केवळ कथा नसून प्रगतीच्या फसव्या चित्राचा भंडाफोड करतात. जग बदलत असलं तरी माणसाची भीती, असुरक्षा आणि निराशा कायम आहे, हे या कादंबऱयांमधून ते दाखवून देतात. अमेरिकन लेखिका सुसान सॉनटॅग यांनी त्यांना अपोकॅलिप्सचा स्वामी म्हटले होते. त्यांच्या दृष्टीने अपोकॅलिप्स म्हणजे जगाचा अंत नाही, तर अर्थ हरवण्याची अवस्था आहे आणि हा अर्थ फक्त कलाच पुन्हा जिवंत करू शकते. प्रसिद्ध दिग्दर्शक बेला टार यांच्या मते लास्झलो क्रास्नाहोरकाई& यांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा मेणबत्तीची एक थरथरणारी ज्योत आहे, जी वाऱयातही न विझता टिकून राहते. क्रास्नाहोरकाईंचे लेखन वाचकाला आराम देत नाही, तर ते विचार करायला भाग पाडते. ‘निराशेकडे पाहणे टाळू नका, तिच्याकडे थेट पाहा आणि तिच्यात लपलेला अर्थ समजून घ्या’ हा संदेश त्यांच्या वाचनातून मिळतो. त्यांच्या लेखनाची तुलना काफ्का, बर्नहार्ड आणि बेकेट यांच्यासोबत केली जाते. या सर्वांनी आधुनिक जगाच्या वेदनेला भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले, पण क्रास्नाहोरकाईंची शैली स्वतंत्र आहे. मध्य युरोपच्या अंधुक वातावरणातून जन्मलेली आणि जगभरातील अस्वस्थांशी बोलणारी. 2002 साली हंगेरीचेच लेखक इम्रे केर्तेश यांनी नोबेल पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर जवळ जवळ 20 वर्षे हंगेरी शांत होती. क्रास्नाहोरकाईंच्या पुरस्कारामुळे ती शांतता पुन्हा एकदा बोलकी झाली आहे. आजचा काळ पुन्हा त्यांच्या कादंबऱयांसारखा झाला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती जगभरात वाढत आहेत, करुणा कमी होत आहे, भाषा आणि वनसंपदा नाहीशी होत आहे. अशा काळात त्यांचे गंभीर साहित्य मोलाचे ठरणारे आहे. या पुरस्कारामुळे जगभरात क्रास्नाहोरकाईंच्या पुस्तकांची पुन्हा चर्चा होईल. जुनी पुस्तके पुन्हा छापली जातील, नवीन वाचक निर्माण होतील. काहींना त्यांचे लेखन कठीण वाटेल, पण जे वाचून पुढे जातील त्यांना ते बदलून टाकेल. क्रास्नाहोरकाई शेवटांबद्दल लिहितात, पण त्यांच्या वार्यांना शेवट नसतो. ती पुन्हा वळतात, पुन्हा सुरू होतात. जीवनचक्रही असेच सुरू असते. अव्याहत. त्या सातत्यावर, निरंतरतेवर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. अर्थ हरवला तरी भाषा अजूनही आश्रय देऊ शकते आणि त्या आश्रयाला क्रास्नाहोरकाई आशा म्हणतात.