
>> सुधीर गाडगीळ
‘तुम्ही तुमच्या बाबांकडून काय घेतलं,’ असं मी त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, माझं गाणं ही बाबांची देण आहे. त्यांची सूर लावायची पद्धत ‘ग्रेट’ होती. सूर सोडताना ते जोर द्यायचे. त्यांच्या सगळ्या जागा विलक्षण होत्या. स्टेजवर ते फार विलक्षण गायचे. ‘धिक्कार मनसाहिनी…’ या त्यांच्या पदाला मुंबईच्या ग्रॅण्ड थिएटरमध्ये 14 वन्समोअर घेतलेले बाबा मी पाहिले आहेत. मला आठवतं, बाबांना वन्समोअर पडला की ते राग बदलून गाणं गात. राग इतका चटकन बदलत की कमाल वाटे. बाबा सफेत 4 आणि 5 च्या सुरात किंवा त्याही वरती गायचे, लाइट नाहीत, माइक्स नाहीत. गॅस बत्त्यांच्या प्रकाशात पीठापर्यंत आवाज गेला पाहिजे ही भूमिका असे. बाबांचा पट्टीने आवाज लागायचा.
आपल्या दैवी सुरांनी स्वरसम्राज्ञी, ‘भारतरत्न’ लतादीदी प्रत्येकाच्या मनात रुजलेल्या आहेत असेच मी म्हणेन. 60 वर्षांपूर्वी माझ्या शाळेच्या काळात आमच्याकडे ‘एवरमेक’ कंपनीचा जुना रेडिओ होता. त्यावार शनिवारी दुपारी मराठी गाणी लागत तेव्हापासून आजपर्यंत त्यांची गाणी ऐकत आलो. माझं भाग्य असं की मला त्यांच्या कार्यक्रमात थेट सहभागी होता आलं. दूरदर्शनवर मीना खडीकर यांचा कार्यक्रम होता. मी लतादीदींच्या मागे उभं राहून त्यांना ‘ये जवळ घे जवळी प्रिय सखया…’ याची मूळ बंदिश म्हणायची आग्रहाने विनंती केली. त्यांनी ती म्हटली हा मला भाग्याचा क्षण वाटतो.
असाच एक आठवणीतला अनुभव सांगावासा वाटतो. गोव्यात चतुरंगच्या ‘जीवनगौरव पुरस्कार’ सोहळ्यात त्यांची छोटी धावती मुलाखत घेतली. ती आठवण लक्षात राहील अशी आहे. तो पुरस्कार स्वीकारताना दीदी म्हणाल्या, ‘बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात बाबांच्याच गोव्यात हा पुरस्कार मिळतो याचे मला विशेष महत्त्व आहे. ‘पु. लं.पासून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यापर्यंत हा पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी छोटी आहे.’ या त्यांच्या वाक्यात किती विनम्रता दिसते! याच कार्यक्रमाच्या मुलाखतीमध्ये त्यांना त्याच्या ‘50 ते 60 वर्षांच्या वाटचालीचा आढावा कसा घ्याल’ असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘पूर्वी अभिनय करता करता गाणारे होते. रफी, किशोर, आशा, नूरजहाँ, मी अशी आमची फळी गाऊ लागली. आम्ही आल्यावर संगीतकारही जुनं विसरून नवं करू लागले. कुठलाही सूर दिला तर ते गायक समर्थपणे गाऊ शकतील इतका विश्वास होता संगीतकारांना. आमच्या आधीच्या गायकांच्या बाबतीत मर्यादा होती. ती अशी की, हा सूर इथे ठेवा, ही तान अशी नको असं ते सुचवत. मात्र आमचे पुरुषांचे स्वर होते. काळी 2, सफेत 3, सफेत 4 त्यामुळे आमच्या बाबतीत मर्यादा, बंधने नव्हती.
आनंदघन’ला तुम्ही संगीतबद्ध केले, रसिकांना सर्वात काय आवडलं’, असं मी त्यांना विचारलं तेव्हा दीदी म्हणाल्या, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ याच्या विविध सुरावटी आहेत. एका ठिकाणी भजन वापरलं, बाकी छोटे छोटे पीस केले. एकूणच मराठी पाऊल सर्वांना फार आवडले. मला मात्र ‘शूर आम्ही सरदार…’ आवडले. ‘आनंदघन’चे संगीत देताना सुरावटींना मराठी फोकरंग असावा असा प्रयत्न केला. ‘साधी माणसं’ मध्ये संगीत देताना अस्सल देशी वाद्य वापरली कोकासारखी. मोठी वाद्य आणि मराठी लोकसंगीताची जातकुळी असल्यामुळे हा मराठी बाज आवडून गेला…
दीदींविषयी जाता जाता एक सांगतो, त्याचे दैवी सूर आपल्या मनात रुजले आहेत. माझ्या मोबाईलच्या रिंगटोनमध्ये मदन मोहन यांनी संगीतबद्ध आणि दीदींनी स्वरबद्ध केलेलं गाणं आहे.
शब्दांकन – मेधा पालकर


























































