
सालाबादप्रमाणे यंदाही नाताळ व नववर्षाचे स्वागत करताना मद्यपींच्या जल्लोषात कुठेही कमी पडू नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे 25 व 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने उघडी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे उशिरापर्यंत ‘बसता’ येणार असल्याने तळीरामांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
नाताळपाठोपाठ थर्टी फर्स्टला जल्लोषाचा माहोल असतो. सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कार्यक्रमाचे आयोजन करतो. मनसोक्त जल्लोष करता यावा, त्यात कुठलाही कमीपणा पडू नये याची तळीराम विशेष काळजी घेतात. प्रत्येकाला हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये बसता येणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण वाईन शॉपमधून आपापल्या पसंतीचे मद्य खरेदी करून बसण्याची व्यवस्था करतात. त्यामुळे मद्यपींना कुठल्याही प्रकारे तुटवडा पडू नये याची यंदाही काळजी घेण्यात आली आहे. या वर्षीदेखील मद्यपींची गैरसोय होऊ नये याकरिता 25 आणि 31 डिसेंबर रोजी वाईन शॉप निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोणाला कशी असेल वाढीव वेळ
– विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान – रात्री 10.30 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत
– उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एलएफ-2 अनुज्ञप्ती – रात्री 11.30 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत
– एलएफडब्ल्यू-2 – रात्री 10.30 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत
– एफएलबीआर-2 – रात्री 10.30 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत
– परवाना कक्ष – मध्यरात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत
– क्लब अनुज्ञप्ती – मध्यरात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत
– बीअर बार – मध्यरात्री 12 ते दुसऱया दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत
– सीएल-3 – महानगरपालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी रात्री 11.00 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1.00 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10.30 ते दुसऱया दिवशी मध्यरात्री 1.00 वाजेपर्यंत


























































