
मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा मुलाने खून केला आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात समोर आली आहे. 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला असून आईचा खून करणाऱ्या मयत मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईच्या खुनामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा संशय मृत महिलेच्या मुलीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील काकासाहेब वेणूनाथ जाधव (वय – 48) यांनी रेणापूर-पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याच दरम्यान मयताच्या आईचाही मृतदेह शेतात आढळून आला. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर घटनेची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदाळे (रा. ईडी. ता. रेणापूर) यानंतर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम काकासाहेब जाधव यांनी पोलिसांना शुक्रवारी अशी फिर्याद दिली की, माझ्या वडिलांना माझ्या बहिणीच्या लग्नाचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी शेती विकूया असे म्हणत वडील आजी समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय – 80) हिच्या मागे लागले होते, मात्र आजीचा याला विरोध होता. त्यामुळे वडिलांनी आजीचा काटा काढावा या उद्देशाने तिला जबर मारहाण केली आणि तोंड दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतीतील ऊसाच्या फडात पुरले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 103 (1) 238 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर रेणापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आई व मुलाचे एकाच चितेवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
खुनात आणखी लोक सहभागी, मुलींचा संशय
दरम्यान, मयत समिंद्रबाई जाधव यांना चार मुली व एक मुलगा असून सर्वांचे लग्न झालेले आहेत. यातील चारही मुलीशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की, आमच्या आईच्या व भावाच्या नावे असलेली जमीन आम्हाला नको म्हणून काही वर्षापूर्वी हक्कसोड पत्र करून दिले आहे. त्यामुळे भावाच्या नावे असलेल्या जमिनीवर आमचा कसलाच हक्क नव्हता. आमच्या आईला भावाचे कुटुंब सतत मारहाण करीत होते. गेल्या तीन-चार महिन्यापासून आमचा गावातील कोणाचाही संपर्क होऊ देत नव्हते. त्यामुळे आमचे भावासोबत बोलणे नव्हते. आमच्या आईच्या खुनात अनेकांचा समावेश असावा असा संशय मयताच्या मुलींना व्यक्त केला.