
लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ४४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ९५.२ मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी १८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्धारित धरण पातळीस पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा-तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणाचा पाणीसाठा ८५ टक्के झाला असून धरण निर्धारित धरण पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदीपात्रात सोडावा लागणार आहे. त्यामुळे तावरजा व तेरणा नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जावू नये. पाऊस सुरू असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. लातूर – ६८.१, औसा- ५४.२, अहमदपूर – २२.४, निलंगा- ५४.२, उदगीर – २६.६, चाकूर- २९.५, रेणापूर- २०.७, देवणी – ६२.८, शिरूर अनंतपाळ- ९५.२ आणि जळकोट- १२.५ मिलीमीटर. पाऊस झाला आहे.





























































