
सामना प्रतिनिधी। लातूर
जळकोट तालूक्यातील मौजे चिंचोली येथे रस्त्यावर मतदान स्लिप कशी दिली म्हणून बीएलओचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बालाजी गोविंदराव गव्हाणे याने जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तालूका दंडाधिकारी जळकोट यांनी बीएलओ म्हणून फिर्यादीची नेमणूक केली आहे. 12 एप्रील रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचोली येथे फिर्यादी मतदान स्लीप व मतदान ओळखपत्राचे वाटप करत होता. हनुमान मंदिराजवळ अभंग दिगांबर गव्हाणे उभा होता. गोविंदरावने त्याला मतदान स्लीप दिली असता त्याने मला रस्त्यावर स्लीप का देतोस म्हणून अश्लील शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून दिलेली स्लीप रस्त्यावर फेकून दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

































































