
सामना प्रतिनिधी। लातूर
निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील शेतकरी सिद्राम बब्रूवान जाधव यांनी शेतात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. जाधव यांना एक हेक्टर शेत जमीन असून त्यामध्ये त्यांनी पपई लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडून सुमारे एक लाखापेक्षा अधिक रकमेची कर्ज काढलेले होते. पण पाण्याअभावी पपई हाती येणार नाही. अशी चिंता त्यांना वाटत होती. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून आपल्या आत्महत्येमुळे घरच्यांना त्रास देऊ नये असेही त्यात नमूद केले आहे.
पहाटे तीन वाजता पाणी देण्यासाठी म्हणून ते शेताकडे गेलेले होते. शेताकडे गेलेले जाधव घरी परत आले नाहीत म्हणून घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.































































