
लातूर शहरातील विशाल नगर भागातील श्री साई मंदिरा शेजारी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
लातूर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. मरण पावलेल्या मुलाचे नाव राहुल उजळंबे (वय 19, रा. मोती नगर, लातूर) असे असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान एका व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या खूनाची लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील गुन्हा का घडला याचादेखील पोलीस तपास करीत आहेत. लातूरमध्ये या प्रकाराने खळबळ उडाली आहे.



























































