नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख रुपये उकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

सामना प्रतिनिधी। लातूर

शिक्षक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणाकडून २५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी खणी विभागातील तुळशिराम शिंदे प्राथमिक विद्यालयाचे संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील भालकी, जि.बिदर येथील सतीश बाबुराव ढगे हा तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याने बी.ए., डी.एड केले होते. खणी विभागातील तुळशीराम शिंदे प्राथमिक शाळेचे संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे, मुख्याध्यापक महानंदा उस्तुर्गे, शिक्षक नेते मोहन हाके आणि इतर शिक्षकांनी सतीशला शिक्षक पदाची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शिक्षक पदाच्या नोकरीसाठी जून २०११ आणि जानेवारी २०१२ मध्ये त्याच्याकडून रोख २५ लाख रुपये उकळले. त्याला शिक्षणाधिका-यांच्या खोट्या सहीचे बोगस “शासन आदेशही” दिले.

त्यानंतर सतीशने लातूर येथे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरु केले. त्यानंतर संस्थाचालक राजेंद्र शिंदे. मुख्याध्यापक महानंदा उस्तुर्गे, संस्थाचालाकाचे नातेवाईक व इतर आरोपींनी जानेवारी २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून तुमचे शिक्षक पदाचे अप्रूव्हल काढायचे आहे, असे सांगून सतीशकडून उर्वरित १५ लाख रुपयांची रक्कम ढगे यांच्याकडून उकळली. ही रक्कम घेतल्यानंतर राजेंद्र शिंदे आणि इतरांनी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून एका महिन्यात शिक्षकपदाचे अप्रुव्हल आम्ही आणून देऊ असे सांगितले.

पण यास बरेच महिने उलटले तरी अप्रुव्हल मिळत नसल्याने सतीशने याबदद्ल त्यांना विचारले. पण प्रत्येक वेळी काही तरी कारण सांगून सगळे त्याला टाळत होते. त्यांनी खूपच तगादा लावल्यानंतर अखेर एप्रिल २०१५ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अप्रुव्हल आणि इतर काही कागदपत्रे त्यांना देण्यात आली. अप्रुव्हल मध्ये सतीश याच्यासह एकूण चार शिक्षकांचे नाव होते. शासनाचा नियमित पगार कधी सुरु होणार असे विचारले असता, लातूर जिल्ह्यात सध्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे, यामुळे तुम्ही या अप्रुव्हल बद्दल सध्या कुणालाही काही बोलू नका, शांत राहा काही दिवसांनी नियमित पगारही सुरु होईल असे सतीश ढगे यांना सांगण्यात आले.

एप्रिल २०१५ पासून मे २०१८ पर्यंत हे सर्वजण काही तरी कारण सांगून सतीशला गप्प करीत होते. पण अखेर मे २०१८ मध्ये सतीश ढगे यांनी लातूर मधीलच त्यांचे एक नातेवाईक तथा शिक्षक नेते भानुदास बिरादार यांना याबाबत सांगितले. त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागात याबाबत चौकशी केली. तेव्हा कसलेही अप्रुव्हल निघाले नसल्याचे आणि सतीशला ना देण्यात आलेले अप्रुव्हल हे शिक्षणाधिकारी यांची खोटी सही केलेले आणि बनावट असल्याचा प्रकार समोर आला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २४ मे २०१८ रोजी सतीश व त्याच्या घरातल्यांनी संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे व इतरांना बोलावले. आम्हाला आमचे पैसे परत द्या, अशी विनंती त्यांनी केली. पण या सर्वांनी सतीस व त्याच्या कुटुंबीयांना यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आणि कसले पैसे, आम्हाला काहीही माहिती नाही, आम्ही पैसे घेतले नाही असे म्हणत तुम्हाला काय करायचे ते करा. पुन्हा आमच्याकडे आलात, तर खतम करून टाकू अशी धमकी देत त्यांना तिथून हाकलून लावले. त्यानंतर सतीश व त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली.