लातूर महानगरपालिकेचे गोदामावर छापे, 2 टन प्लास्टिक जप्त

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक विरोधातील मोहीम दणक्यात सुरू आहे. या अंतर्गत मंगळवारी प्लास्टिकची साठवणूक करणार्‍या गोदामांवर छापे मारण्यात आले. यात अंदाजे 5 लाख रुपयांचे 2 टनहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्लास्टिकची मोजदाद सुरू होती. त्यामुळे जप्त केलेल्या प्लास्टिकचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी असतानाही काही व्यावसायिक व नागरिकांकडून हे प्लास्टिक वापरले जाते. त्यामुळे मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या आदेशानुसार पालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. संबंधितांना आर्थिक दंडही केला जात आहे. या मोहिमेअंतर्गतच मंगळवारी शहरातील गोदामावर छापे मारण्यात आले.

मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे व सर्व मुख्य स्वछता निरिक्षक यांनी ही कारवाई केली. यात सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा हाती लागला. सुमारे 2 टनापेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत या प्लास्टिकची मोजदाद सुरू होती. मंगळवारी जप्त करण्यात आलेले प्लास्टिक अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपयांचे आहे.