खुनाच्या आरोपात जेलमध्ये असलेला आरोपी पॅरोलवर आला असताना पॅरोल संपण्याच्या एक दिवस आधी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पत्नीला गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उदगीर शहर हद्दीतील सोनू उर्फ अमित नाटकरे हा एका प्रकरणातील खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. तो पंधरा दिवसाच्या पॅरोलवर (रजेवर) होता. रजा संपायच्या एक दिवस अगोदर त्याने त्याच्यावर उदगीरच्या न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या विरोधात अपील करण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता. त्यासाठी सासू-सासऱ्यावर जमीन एकूण पैसे द्या असा आग्रह धरला होता.
सदर आरोपी बुधवारी रात्री एक ते सकाळी सहाच्या दरम्यान त्याचा सासरा-सासु बायको भाड्याने राहत असलेल्या समता नगर शाहु चौक येथील भीमराव शिवराज बिरादार यांच्या घरी गेला. बायकोने पैसे दिले नसल्याचा राग मनात धरुन पत्नी भाग्यश्री (35) हिच्यावर बंदूक काढून बंदुकीने डोक्यात गोळ्या घालून खुन केला असल्याची फिर्याद चंद्रकांत विनायक गव्हाणे (रा. समता नगर शाहू चौक उदगीर) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी सोनू नाटकरे (43) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील आरोपी हा फरार असून या आरोपीला पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहे. लवकरच आरोपीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी दिली आहे.