
मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यात घडली आहे. मामाच्याच शेतात जाऊन तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला. या धक्कादायक घटनेमुळे शिंदखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी (28 डिसेंबर 2025) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विष्णू जंगलबोणे हा शिंदखेड येथील रहिवासी होता. मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने विष्णू गेल्या काही दिवसांपासून मानसिक विवंचनेत होता. याच नैराश्यातून त्याने रविवारी सायंकाळी आपल्या मामाच्या शेतात अनसरवाडा शिवारात जाऊन तेथील चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला व आपले जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.
याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार एम. आय. जेवळे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

























































