
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवीन घेतलेल्या हार्वेस्टर मशीनने एका तरुण ऑपरेटरचा बळी घेतला आहे. सचिन राजकुमार धिम्मान (वय – 28, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) असे हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील झरी येथील गट क्रमांक 165 मध्ये इरफान लायक मुल्ला यांच्या शेतातील तूर काढण्यासाठी हे हार्वेस्टर मशीन बोलावण्यात आले होते. हे मशीन अगदी नवीन होते, आदल्या दिवशीच त्याची विधिवत पूजा करण्यात आली होती. शुक्रवारी दिवसभर तुरीची रास केल्यानंतर, सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ऑपरेटर सचिन हा मशीनची साफसफाई करत होता. मात्र, नियतीने घात केला आणि साफसफाई करत असताना सचिनचा पाय घसरून तो चालू मशीनमध्ये अडकला. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी निलंगा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. शेतकरी इरफान मुल्ला यांच्या जबाबावरून निलंगा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
























































