बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर कथित पोस्ट करत बिश्नोई गँगने ही जबाबदारी स्वीकारली असून यामागील कारणही सांगितले आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सदस्याने कथितरित्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. यात सलमान खान याच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी सख्य असल्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण आमच्या भावाचे (लॉरेन्स बिश्नोई) याचे तुम्ही खूप नुकसान केले. आज बाबा सिद्दिकी सभ्यतेचा आव आणत असला तरी एकेकाळी दाऊद इब्राहिमसोबत मोक्का कायद्यामध्ये अडकला होता. दाऊदला बॉलिवूड, राजकारण आणि प्रापर्टी डिलिंगशी जोडणे हेच त्याच्या मृत्युचे कारण आहे, असे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये अनुज थापन याच्या नावाचाही उल्लेख आहे. याच अनुजने सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर गोळीबार केला होता आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. बाबा सिद्दिकीची हत्या हा त्याचा बदला असून जो कुणी सलमान खान किंवा दाऊद गँगला मदत करेल त्याचा हिशेब आम्ही करू, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कशी झाली हत्या?
अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळीबार झाला. एका कार्यक्रमाला जात असताना रात्री साडे नऊच्या सुमारात तीन आरोपींनी अत्यंत जवळून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी 9.9 एमएम पिस्तूलमधून सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील काही गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या, तर काही त्यांच्या गाडीला लागल्या. या गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. गुरमैल हरियाणा, तर धर्मराज उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचे नाव शिवा असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.