
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शब्दशः आणि कोणतीही गोष्ट न लपवता भूमिका मांडली. ते म्हणाले, दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला वेळ मिळाला. आज इथे आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली. ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला?
ते पुढे म्हणाले, त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. एका दाखल्यात ‘Accidental Death Report’ झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे, असं स्पष्ट आहे. दुसऱ्या दाखल्यात काही झालं तरी एफआयआर घ्यावाच लागतो, ही पोलिसांची जबाबदारी आहे, असं नमूद आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, देशाच्या नागरिकाचा जर एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील हे येत्या काळात कळेल; पण त्यांनी सांगितलं की दादांना मी जवळून ओळखत होतो, आम्ही काम केलेलं आहे. जेव्हा केव्हा भेटायचो तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाहीतर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी आमच्या लेव्हलला त्या ठिकाणी करेन.
मा. राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र… pic.twitter.com/9aOaLHGD1y
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026
आता विधिमंडळामध्ये काही आमच्या बैठका आहेत. काही लोकांनी मला वेळ दिलेला आहे, तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
जे कुठले पायलट ते विमान चालवत होते ते जिवंत आहेत असं समजून चालणार नाही. जे आधी पायलट त्यांची नियुक्ती झाली होती त्यांचं नंतर कॅन्सल झालं. दुर्घटनेच्या वेळी त्या विमानामध्ये पाच जण होते – दादा, अटेंडंट माळीताई, जाधव नावाचे सिक्युरिटी, पाठक नावाचे को-पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट. हे पाचच्या पाच व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे तर तसं कुठेच काही नाही.
अपघात झाला का घातपात झाला याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. एक तर या महाराष्ट्रामध्ये एफआयआर घेतलाच जात नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. एफआयआर देणं हा आमचा अधिकार आहे आणि तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे. एफआयआरमध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत ज्यांच्याबद्दल आपण एफआयआर करणार आहोत, जेव्हा हा विषय सीआयडीकडे जातो नाहीतर सीबीआयकडे जातो, एफआयआर झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्वेस्टिगेशन करावंच लागतं. जर आपण एफआयआरमध्ये मुद्दे घेतले नाहीत तर क्रिमिनल इन्वेस्टिगेशन होणार नाही, फक्त अपघाताचं इन्वेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका आम्ही घेतली आहे. जनतेनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की एफआयआर का महत्त्वाचा आहे.
माझ्यावर टीका करत काही सत्तेतले नेते म्हणाले की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा. पण तुम्ही सत्तेत आहात ना? एफआयआर हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून माझा एफआयआर घेतला जात नाही का? सत्तेचा वापर करून तपासाची दिशा बदलू नका. साधा एफआयआर करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. आम्ही महाराष्ट्रातील जनता, इतर पक्षांचे लोक दादांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत आणि हे लोक भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी करत आहेत. काही महाशय म्हणाले की नवीन पर्व सुरू झालं. अजित पर्व संपणार नाही. लोकांच्या मनामध्ये दादांबद्दल प्रेम आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरली मोहोळ यांनी सांगितलं होतं की दुर्घटनेला एक महिना होण्यापूर्वी रिपोर्ट आला पाहिजे. उद्या एक महिना पूर्ण होतो आहे. आता प्राथमिक रिपोर्ट कधी येतो हे आम्ही पाहणार आहोत. मी सोमवारी 11 वाजता मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्या माध्यमातून या घटनेमध्ये काय काय घडलं ते सिद्ध करेन. रिपोर्ट आज-उद्या येणार आहे. जर तो थातूर-मातूर, नावापुरता दिला तर महाराष्ट्राची जनता त्यांना सोडणार नाही. योग्य पद्धतीचाच रिपोर्ट दिला गेला पाहिजे.
दुर्घटनेनंतर आम्ही सगळे दुःखात होतो. पवार साहेबांना शब्द फुटत नव्हते. लोकांना अडचण होऊ नये, दंगल उसळू नये म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलं. ते कॅमेऱ्याकडे बघून दिलं नव्हतं; त्यांना लिहून दिलं आणि त्यांनी वाचलं, कारण ते खूप भावनिक झाले होते. अशा वेळी राजकारण करणं चुकीचं आहे.
सुनेत्रा काकींबद्दल ते म्हणाले, त्या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराचा एक घटक आहेत. त्या स्वतः प्रेस कॉन्फरन्सला समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर कळेल की ताकद काय असते आणि नेता कशा पद्धतीने पार्टी चालवतो.
आमच्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले? सुनेत्रा काकी झालेले आहेत. उपमुख्यमंत्री कोण आहेत? सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे स्टेजवर आणि इतर ठिकाणी वागताना जरा सांभाळून वागा. महिलांचा आदर ठेवणं महत्त्वाचं आहे. काल आम्ही बघितलं – कोणीतरी काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतो. हे बघून महाराष्ट्राची जनता काय विचार करेल?
‘विलिनीकरण’ हा शब्द आम्ही जास्त वापरला का त्यांनी जास्त वापरला? अजित दादा पक्षाचे जे चार लोक आहेत त्यांनी हा विषय जिवंत ठेवला आहे. एका महिला आमदारांनी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलं. जर एखाद्या नेत्याला आमदारांपासून दूर ठेवलं जात असेल तर मग बाकीच्यांचं काय? दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊ दिल्या जात नव्हत्या. पण जर होत असतील तर काकींनी सांभाळून राहिलं पाहिजे. एक पुतण्या म्हणून मी विनंती करतो.
दादांचं अर्धवट स्वप्न काय होतं? आम्ही सगळे बघत होतो की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा होती. पण अर्धवट स्वप्न विकासाच्या कामांबद्दल होतं. दादा नेहमी विकासाबद्दल बोलायचे, महाराष्ट्राला नंबर एक राज्य बनवायचं.
श्रद्धांजली व्हिडिओबद्दल ते म्हणाले, दादांचं 40 वर्षांचं राजकीय कार्य आहे. 1985 पासूनचं योगदान आहे. सहकार चळवळ आहे. पण व्हिडिओमध्ये फक्त दोन वर्षांचा विषय दाखवला. ‘कॅश बॉक्स’च्या पद्धतीने का दाखवलं? एखाद्या एजन्सीने जाणीवपूर्वक दोन वर्षांचा भाग दाखवून बाकीचं झाकलं का? दादांचं इतकं मोठं कार्य असताना ते छोटंसं का दाखवलं?
शेवटी ते म्हणाले, आमचं एकच म्हणणं आहे — एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यावरच इन्वेस्टिगेशन होईल. इन्वेस्टिगेशन योग्य पद्धतीने झालं तरच दादांना न्याय देता येईल. मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.




























































