
सामना प्रतिनिधी, मालवण
शासनाची बंदी असलेल्या एलईडी लाईट मासेमारी बोटींद्वारे सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीमुळे कोकण किनारपट्टी अशांत बनली आहे. संतप्त मच्छीमारांकडून या अनधिकृत मासेमारीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता मत्स्य विभागाने देवबाग किनारपट्टीवर 11 नॉटिकल मैल खोल समुद्रात धडक कारवाई करत गोवा येथील एलईडी लाईट पर्ससीन मासेमारी ट्रॉलर ताब्यात घेतला आहे.
नौकेवर पर्ससीन मासेमारी जाळे, 2 पाण्याखालील एलईडी लाईट, 2 मोठ्या एलईडी लाईट, 8 एलईडी गोल लाईट तसेच सोबत असलेल्या एका दुसऱ्या नौकेत जनरेटर असे सर्व साहित्य व नौकेवरील सर्व खलाशी यांना मत्स्य व्यवसाय विभागाने ताब्यात घेत नौकेसह मालवण बंदरात आणले आहे. मालवण बंदरात पकडलेली नौका मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेला बांधून अवरुद्ध करून ठेवण्यात आली आहे. तर नौकेचे स्टेरिंग व्हील काढून ठेवण्यात आले आहे. मत्स्य विभागाचे कर्मचारी बोटीवर लक्ष ठेवून आहेत तर पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. दरम्यान पकडलेल्या ट्रॉलरवर कोणती कठोर कारवाई होणार याकडे अशांत किनारपट्टी व संतप्त मच्छिमार वर्गाचे लक्ष लागले आहे.
शीतल गस्ती नौकेद्वारे कारवाई
मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेतून मत्स्य विभागाचे परवाने अधिकारी सतीश खाडे, सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त, श्री मालवणकर, पोलीस कर्मचारी महाडिक यांच्या पथकाने देवबाग किनारपट्टीवर 11 नॉटिकल मैल खोल समुद्रात कारवाई करत एलईडी लाईट नौका वेलांकणी आयएनडी जीए 01 एमएम 3152 ही ताब्यात घेतली.
सोमवारी तहसीलदार यांच्याकडे कारवाई प्रस्ताव
कारवाई दरम्यान एलईडी लाईट नौका मासेमारी करण्याच्या तयारीत होती. त्यामुळे नौकेवर मासळी सापडून आली नाही. मात्र शासनाची बंदी असताना एलईडी लाईट मासेमारी बोट सापडली आहे. याबाबत पंचनामा पूर्ण करून सोमवारी बोटीची कारवाई प्रस्ताव मालवण तहसीलदार यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांनी दिली.
रात्री कारवाई दिवसा निवडणूक काम
मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांच्याकडे मालवण व वेंगुर्ला तालुक्यांचा पदभार आहे. ते काम करून रात्रभर समुद्रात कारवाई केल्यानंतर निवडणूक कामासाठी त्यांना जावे लागत आहे. तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडे रिक्त असलेल्या कर्मचारी पदांची भरणा झाल्यास अश्या कारवाई अधिक होतील. अथवा खाडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची अतिरिक्त चार्ज मधून सुटका झाल्यास अधिक मोठ्या कारवाई होण्यास निश्चितच मदत होईल.


























































