पनवेल महापालिका शिवसेना गटनेतेपदी लीना गरड, कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी लीना गरड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आज त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि सर्व कागदपत्रे कोकण आयुक्तांना सादर केली आहेत.

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण सात नगरसेवक विजयी झाले. त्यातील लीना गरड, उत्तम मोर्बेकर, प्रिया गोवारी, प्रतीक्षा गोवारी आणि मेघना घाडगे हे पाच नगरसेवक शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली.

यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गटनेतेपदासाठी लीना गरड यांची एकमताने निवड करण्यात आली. आज उपनेते बाळ माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी लीना गरड यांची गटनेतेपदी निवड व्हावी यासाठीची कागदपत्रे सादर केली.