‘येथे’ बसवतात डाव्या हाताने आशीर्वाद देणारी गणेशमूर्ती

जे.डी. पराडकर । देवरुख

श्री गणेशाची मूर्ती साधारणपणे उजव्या हाताने आशीर्वाद देणारी असते. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील निवृत्त प्राध्यापक राम घाणेकर यांच्या घरी प्रतिष्ठापना होणारी मूर्ती डाव्या हाताने आशीर्वाद देणारी असते. ही मूर्ती ‘जर्मन गणेश’ म्हणून ओळखली जाते. या वेगळेपणामुळे ही मूर्ती हा कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय आहे.

एरव्ही विविध सुपारी, प्रतिमा किंवा श्रीफळ अशा विविध रूपांत श्री गणेशाची पूजा होत असली, ती गणेश चतुर्थीमध्ये मूर्तीचीच पूजा केली जाते. मूर्तीचे रंग, आकार आणि प्रकार वेगवेगळे असले, तरी आशीर्वाद देणारा हात उजवाच असतो. म्हणूनच प्रा. घाणेकर यांच्या घरातील डाव्या हाताने आशीर्वाद देणारी मूर्ती वेगळी ठरते. वेगळा असल्याने त्याला ‘जर्मन गणेश’ असे म्हटले जाते. घाणेकर यांच्या घरात ही प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. गेली काही वर्षे ही मूर्ती उदय भिडे यांच्या मूर्तिशाळेत बनवली जाते. या वर्षीही ही मूर्ती तयार झाली असून, चतुर्थीला तिची प्रतिष्ठापना होणार आहे.

विविध प्रकारच्या गणेशमूर्ती
भारताबाहेरही अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अनेक गणेशमूर्ती द्विभुज आहेत. अनेक ठिकाणी मूर्तीच्या हातात मोदकभांडे, कुऱ्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. भारतात व भारताबाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतात. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभुज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मिरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणाऱ्या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे; पण ‘प्राणतोषिनी तंत्र’ या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देऊन असतो, असा उल्लेख आहे.