विधान भवनाची सुरक्षा वाऱ्यावर, सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी विनापास माणसे घुसवली, सुरक्षा समितीचा अहवाल

नागपूर येथील विधान भवनाची सुरक्षा वाऱयावर आहे. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी विनापास माणसे घुसवल्याचे समोर आले आहे. विधान भवनाच्या सुरक्षा समितीने तसा अहवाल विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना दिला आहे. त्यात विधान परिषदेतील सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार आणि विधानसभेतील 12 आमदारांचा समावेश आहे. तसेच एक कॅबिनेट मंत्रीही त्यात आहे.

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मुंबईतील विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर कोणत्याही आमदार किंवा मंत्र्यासोबत विनापास व्यक्तींना अधिवेशनाच्या परिसरात प्रवेश न देण्याचे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते, त्याची पायमल्ली हिवाळी अधिवेशनात झाली.

पहिल्या दिवशी यांनी दिला प्रवेश

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषद सदस्य परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तींना आत आणल्याचे सुरक्षा विभागाने निदर्शनास आणले आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी हा अहवाल सभागृहात वाचून दाखवून नाराजी व्यक्त करतानाच त्याची पुनरावृत्ती होऊ नये असे निर्देश सर्वच आमदारांना दिले.

दुसऱ्या दिवशी यांनी पास नसताना सोबत लोकांना आणले

आज दुसऱया दिवशीही तसा प्रकार घडला. आमदार राजू कोरमोरे, महेश शिंदे, प्रवीण तायडे, किशोर जोरगेवार, सिद्धार्थ खरात यांनी प्रत्येकी एका व्यक्तीला पास नसतानाही विधान भवनात घुसवले. आमदार प्रकाश सुर्वेंनी दोन व्यक्ती विनापास विधान भवनाच्या आवारात आणल्या. याशिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विधान भवनात आलेल्या व्यक्तीकडेही पास नसल्याचा सुरक्षा यंत्रणांच्या अहवालात उल्लेख आहे.

z हे दोन्ही गोपनीय अहवाल आता पुढील कारवाईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. संबंधित सदस्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता आहे.