370 हटवल्यानंतर ‘हा’ जिल्हा झाला देशातला सर्वात मोठा जिल्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात 370 कलम हटवल्यानंतर मोठे बदल घडले. ते सामाजिक आणि राजकीय तर होतेच पण, भौगोलिकदृष्ट्याही हिंदुस्थानचा नकाशा बदलला. हा बदल म्हणजे जम्मू-कश्मीर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतर होय.

केंद्राने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्यामुळे 70 वर्षांनंतर येथील जनता आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवत आहे. त्यासोबतच लडाखमधील एका प्रदेशाची ओळखही आता देशातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून होत आहे. यापूर्वी क्षेत्रफळाच्या दृष्टिने गुजरातमधील कच्छ हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता लडाखमधील लेह हा जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. कच्छचं क्षेत्रफळ 45,652 चौ किमी इतकं होतं तर लेहचं 45,110 चौ किमी इतकं. पण आता नवीन नकाशानुसार पाकव्याप्त कश्मीरचाही काही भाग समाविष्ट झाल्याने लेहचं क्षेत्रफळ वाढलं आहे.

हिंदुस्थानच्या नवीन नकाशात जम्मू कश्मीरहून लडाखचे क्षेत्रफळ मोठे आहे. लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे आहेत. त्यातील लेह हा जिल्हा सर्वात मोठा आहे. लेहमधील बहुतांश भाग हा पाकव्याप्त कश्मीर असून काही भाग चीनच्या ताब्यात आहे.