संशोधक अंतराळयात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

[email protected]

अंतराळ संशोधनात विज्ञानाच्या सर्वच शाखांमधील तज्ञांची आवश्यकता भासते. विशेषतः अंतराळात जाऊन जेव्हा काही उपकरणांद्वारे विशिष्ट प्रयोग करायचे असतात किंवा अंतराळ स्थानकावर राहून अंतराळवीर स्वतः अनेक प्रयोग करतात तेव्हा वापरली जाणारी साधनसामग्री, उपकरणे ही उत्तर दर्जाची आणि अचूक निदान करणारी असावी लागतात. गेल्या पन्नास-साठ वर्षांत अंतराळ संशोधनाने विलक्षण गती प्राप्त केली आहे. आपल्या देशाची अंतराळयानंसुद्धा अवकाशभरारी घेऊ लागली आहेत. चांद्रयान मालिकेतलं पुढचं यान आणि त्यानंतर गगनयानातून संपूर्ण हिंदुस्थानी अंतराळयानातून, हिंदुस्थानी अंतराळवीर अवकाशात पाठविण्याचा आपलाही महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम आहे. असा कार्यक्रम जगातल्या मोजक्याच देशांना परवडतो. अमेरिका त्यात आघाडीवर आहे. ‘नासा’ या संस्थेतर्फे आजपर्यंत अंतराळात गेलेल्या सर्वच अंतराळयात्रींचा विविध क्षेत्रातला संशोधनाचा अनुभव ‘विश्वरूप’ जाणून घ्यायला मदत करतो. यात महिला अंतराळयात्रीही आघाडीवर आहेत.

यापैकीच एक एलन ओकोआ. जगातली पहिली हिस्पॅनिक किंवा लॅटिन अमेरिकन अंतराळयात्री. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधल्या लॉस एंजेलिस शहरात एलनचा जन्म झाला. विविध विद्यापीठांमधून भौतिकशास्राचा अभ्यास करीत एलन यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. एखाद्या विषयात संशोधन करावं या विचारातून नंतर एलन यांनी ‘नासा’च्या एमेस रिसर्च सेंटरमध्ये ‘ऑप्टिकल सिस्टीम’ या विषयावर संशोधन करून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या दुर्बिणींची भिंगं आणि आरसे यांची क्षमता अधिकाधिक अचूक व्हावीत यादृष्टीने संशोधन केले.अशा ‘ऑप्टिकल’ उपकरणांमधले दोष दूर करून ती जितकी प्रभावी बनतील तेवढं अवकाशस्थ ‘वस्तूंचं’ सुस्पष्ट चित्र आपल्याला प्राप्त होऊ शकेल. यासंदर्भातील संशोधनाचीं पेटंट (एकाधिकार) एलन यांनी संशोधनातून मिळवला. या विषयावरचे त्यांचे शोधनिबंध अनेक वैज्ञानिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

1990 मध्ये एलन यांची ‘नासा’ने अंतराळयात्री म्हणून निवड केली. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर त्यांना 1993 मध्ये अंतराळप्रवासाची संधी लाभली. 1991 ते 93 या काळात त्यांनी अंतराळ स्थानकातील कार्याबाबत तांत्रिक सहाय्य करणाऱ्या अधिकारी म्हणून काम केले. कम्प्युटर हार्डवेअर, रोबोटिक्स या क्षेत्रात प्रावीण्य असल्याने एलन यांना ऍस्ट्रॉनॉट ऑफिसमध्ये उपप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती.  1993 मध्ये ‘डिस्कव्हरी’ यानाच्या नऊ दिवसांच्या अंतराळ प्रवासातील अंतराळयात्रींमध्ये एलन यांचाही समावेश झाला. या अंतराळयात्रेचं मुख्य उद्दिष्ट होतं ते पृथ्वीभोवती संरक्षक कवचासारख्या असलेल्या ओझोन वायूच्या थराचा अभ्यास करण्याचा. आपल्या 1000 तासांच्या अंतराळ वास्तव्यात एलन यांनी ‘मिशन स्पेशॅलिस्ट’ म्हणून काम केलं. 2002 मध्ये त्या अंतराळयानाच्या फ्लाइट इंजिनीयर होत्या. कोलम्बिया अवकाशयानाला दुर्दैवी अपघात झाला तेव्हा ती दुःखद बातमी देण्याचं कठीण कार्यही त्यांना ‘स्पेस कंट्रोल’ केंद्रातून पार पाडावं लागलं.

‘स्पेसक्राप्ट ऑपरेशन्स’ विभागात 2007 पर्यंत कार्यरत राहिल्यानंतर ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरला उपसंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्या याच सेंटरच्या डायरेक्टरही झाल्या. याआधी हा सन्मान एकाच महिलेला मिळाला होता… आणि एलन या स्पेस सेंटरच्या पहिल्या हिस्पॅनिक महिला संचालक ठरल्या. एलन ओकोआ यांना त्यांच्या अंतराळ संशोधनाबद्दल अनेक मानसन्मान लाभले. सततचं वैज्ञानिक संशोधन, अंतराळातील कामगिरी अशा अवघड जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी आपली फ्लूट वादनाची आवडही जोपासली. ‘स्टॅनफर्ड सिम्फनी ऑर्केस्ट्रा’मध्ये फ्लूट वाजविणाऱ्या एलन यांना ‘सोलो’ म्हणजे एकटीने फ्लूटवादन सादर करण्यातही पारितोषिक मिळाले होते हे विशेष.