बिबट्याने आख्खा घोडा फस्त केला, हरेवाडीच्या घाबरलेल्या ग्रामस्थांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हरेवाडी, मराठवाडी देवूळगाव परिसरात बिबटयाने धुमाकूळ घातला आहे. गेले आठ दिवसांपासून या परिसरात बिबटयाचा वावर सुरु आहे. इथले शेतकरी बंडू काशिनाथ हाडे जनावरे चारण्यासाठी गेले होते. या जनावरांमधील शेळी आणि गायीवर हल्ला करुन बिबट्याने त्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे नागरीक घाबरले आहेत. देवूळगावघाट परिसरात गस्त घालणाऱ्या एका कंपनीच्या पथकालाही बिबट्या दिसला आहे. काही दिवसांपूर्वी देवूळगावघाट इथे एक घोडा बिबटयाने फस्त केल्याचाही दावा नागरिकांनी केला आहे.

ज्या शेतकऱ्याची शेळी आणि गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या होत्या त्याने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. याशिवाय आष्टीच्या वन विभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे. नवनाथ मगर नावाच्या शेतकऱ्याने म्हटलंय की गेल्या शुक्रवारी मराठवाडी भागात बिबट्याने विहिरीजवळ रात्री झोपलेल्या कुत्र्या, मांजरांचा फडशा पाडला. बिबट्याच्या हल्ल्यानंतर कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली होती, गावकऱ्यांनी जेव्हा खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा बिबट्या कुत्री-मांजरी खाताना दिसला होता.