
सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ
परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळच्या भोजनकवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. अंकुश वसंत केदार (२३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अंकुश हा शेतकरी रविवारी शेतात काम करत असताना बिबटयाने त्याच्यावर हल्ला केला. हा बिबट्या गावाजवळील माळरानातून डोंगरदरीत गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भोजनकवाडी गावाच्या आसपास डोंगर जमीन आहे. तसेच परिसरात दौंडवाडी शिवारातील गावातील हा युवक शेतातील मिरचीला पाणी देत होता. यादरम्यान वीज खंडित झाली. पाणी पिण्यासाठी तो विहीरीवर गेला होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात अंकुश जखमी झाला आहे. त्याच्यावर धर्मापुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.




























































