भोकरदनच्या पिंपळगावात बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते शेत शिवारात शनिवारी पहाटे बिबट्याने धुमाकूळ घालत चार जणांना जखमी केले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात दोन जनावरेही जखमी झाली आहेत. या भागात बिबट्याचा संचार वाढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपळगाव कोलते येथे शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानी हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे 4 वाजता घडली. या हल्ल्यात शेतकरी कौतिकराव हिंमतराव सोळुके (65) गंभीर जखमी झाले होते. सकाळी 5 वाजता पिंपळगाव कोलते शिवाराला लागून असलेल्या तळेगाव शिवारात लाईन टॉवरच्या कामासाठी झारखंड राज्यातून आलेल्या मजुरांवरही बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मंगरा मुरमुर हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत आणखी दोघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. देऊळगाव कमान या गावातील वसंत पवार (60) यांच्यावर व खंडाळा गावात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. विटा परिसराततील रामदास पवार यांच्या म्हशींवर व बकरीच्या कडूवरही बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली आहे. मात्र, वनविभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.