
सामना ऑनलाईन । नाशिक
नाशिकच्या सावरकर नगर परिसरातील आर्किटेकट कॉलनीत रविवारी सकाळी नऊ वाजता बिबट्या शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. परिसरातील एका इमारतीमध्ये बिबट्या लपून बसला आहे. या परिसरात बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
नाशिकच्या सावरकरनगर परिसरात 25 जानेवारी रोजी बिबट्याने चार जणांना जखमी केले होते. त्यानंतर पाईपलाईन रोड भागात देखील बिबट्याचा संचार आढळून आला होता. या घटना ताज्या असतानाच रविवारी पुन्हा सावरकर नगरात बिबट्या आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




























































